प्रेम .... तसा अडीच अक्षरांचाच शब्द पण हे प्रेम मनुष्याच्या जीवनात आमुलाग्र
बदल घडवू आणत असतं. मात्र बदल सकारात्मक असेल तरच ते खर प्रेम ठरतं. कारण, पत्नी
असो, प्रेयसी असो वा मित्र, कुणाच्याही माध्यमातून एकदा का या प्रेमाचा हृदयात झरा
फुटला, की मग तो मनुष्य दुसऱ्या कुणाचीही घृणा करू शकत नाही, शत्रुत्व करू शकत नाही
आणि हिंसेचा विचारही त्याच्या मनाला शिवत नाही. हेच खरे प्रेम, पण याच प्रेमामुळे मनुष्याच्य
जीवनात नकारात्मक बदल होत असतील, त्याच्या वागण्या - बोलण्यातून सातत्याने क्रौर्य
आणि हिंसा व्यक्त होत असेल तर असे प्रेम खरे प्रेम असूच शकत नाही, ती केवळ
आपल्याला हवी असलेली व्यक्ती मिळविण्यासाठीचा हव्यास असतो, हे सुद्धा समजून घ्यायला
हवं. इतिहासात अनेक प्रेमाच्या रंगविलेल्या कथा आहेत. त्यातील युद्ध घडवून
आणणाऱ्या आणि रक्तपात घडवून आणणाऱ्या कथा या प्रेमाच्या असूच शकत नाही. कारण, खऱ्या
प्रेमातून केवळ औन्दार्यच व्यक्त होत असतं, क्रौर्य नव्हे!
साऱ्या जगभर ‘प्रेमाचे प्रतिक’ म्हणून मानला गेलेला आग्र्यातील ताजमहाल या दृष्टीने खरेच प्रेमाचे प्रतिक आहे का याचा विचार करण्याची गरज आहे. तसा विचार बिहारमधील एका साध्या मजुराने करायला भाग पाडलं आहे. दशरथ मांझी त्याचा नाव. दशरथ मांझी आता हयात नाही पण पत्नीप्रेमापायी या माणसाने एकट्याच्या बळावर एक पहाडच खोदून काढला आणि परिसरातील ६० गावांच्या हजारो नागरिकांची कायमची रस्त्याची सोय केली.
अंजुमन बानो म्हणजे मुमताज महल या आपल्या
पत्नीवर शहजहानचे अतिशय प्रेम होते त्याच प्रेमातून तिच्या मृत्युनंतर तिच्या
स्मरणार्थ बादशहाने आग्र्यात एक मोठ्ठी कबर उभारली; त्यालाच आपण ताजमहाल म्हणतो
आणि साऱ्या जगभर ते प्रेमाचा प्रतिक म्हणून मानल्या जाते. हा ताजमहाल उभारण्यासाठी
शहाजहानला २२ वर्षे लागली. शहाजहान आणि दशरथ मांझी यांच्या प्रेमकथेत केवळ हेच एक
साम्य आहे, कारण पहाड खोदून रस्ता बनवायला माझीलाही २२ वर्षेच लागली. सतराव्या शतकाच्या
पूर्वार्धात म्हणजे १६३० मध्ये ताजमहालाच्या निर्मितीची सुरुवात झाली. त्याचे काम
१६५२ मध्ये पूर्ण झाले. ताजमहालाच्या या निर्मितीत बरीच संपत्तीची उधळण झालेली
दिसते बगदाद, बुहारा, तुर्कस्थान, समरकंद, इराण या ठिकाणाहून अनेक कुशल कारागीर
बोलावण्यात आले आणि त्यातल्या ३७ दक्ष कारागिरांना निवडण्यात आले त्यांच्या
हाताखाली २० हजार मजूर देण्यात आली. ४०० वर्षापूर्वी ताजमहाल उभारण्याला ३५ लाखाचा
खर्च आला होता असे सांगण्यात येते. एवढा अमाप पैसा निश्चितच जनतेचा तिजोरीतला होता
आणि जनता जशी स्वयंस्फुर्तीने मंदिरासारख्या सार्वजनिक कामासाठी पैसा देते तसा तर
जमा झालेलाच नव्हता. एका पत्नीच्या प्रेमासाठी शहाजहानने पैश्याची इतकी उधळण केली.
प्रत्यक्ष कामाच्या वेळी बिचाऱ्या कित्येक गरीब मजुरांचा अपघाती बळीही गेलेला असेलच.
प्रेम स्वत:ला काही मिळवून घेण्यासाठी नव्हे, तर
इतरांना काही देण्यासाठी असतो. हे सद्गुण, औंदार्य, संवेदनशीलता आणि त्यागाचं मूर्तिमंत
प्रतिक असतं, हे दशरथ मांझीच्या प्रेमप्रकरणाने जगाला दाखवून दिले आहे.
बिहारमधल्या गया जिल्ह्यातील एका खेड्यात राहणारा दशरथ मांझी. मजुरीवर त्याचा
चरितार्थ. पण पत्नीवर त्याचा अपार प्रेम होते. दशरथ मांझीचे गाव जंगल क्षेत्रातले.
रुग्नालयाचीच काय तर इतर कोणाची कोणतीच सोय या व आसपासच्या कोणत्याच गावांमध्ये
नव्हती. पाणी आणायलाही एक पहाड ओलांडून जावे लागत असे. दशरथच्या गावातील लोकांना बाजारासाठी
ज्या गावाला जायचे असे, त्या गावाला जाण्याच्या रस्त्यात हा पहाड उभा होता. या
पहाडाला वळसा घालून जातांना गावकऱ्यांना धोकादायक जंगलातून ८ किमीचा जीवघेणा
प्रवास करावा लागे. दशरथची पत्नी फागुनीदेवी अशीच एक दिवस दशरथसाठीच पाणी आणायला
निघाली. पहाडावर पाय घसरून पडली आणि गंभीर
जखमी झाली. गावात दवाखाना नाही आणि पहाडामुळे ताबडतोब बाहेरगावच्या रुग्णालयात नेणे
शक्य नाही अशा स्थितीत फागुनीदेवीचा १९५९ मध्ये मृत्यू झाला. येथूनच दशरथाच्या
जीवनाला कलाटणी मिळाली. आपल्यामुळेच आपल्या प्रिय पत्नीचा मृत्य झाला असा समज होऊन
दशरथच्या मनावर फार परिणाम झाला. १९६०
मध्ये एकट्यानेच पहाड खोदून रस्ता तयार करण्याचा त्याने निर्णय केला. त्या आधी
पहाडातून रस्ता तयार करण्यासाठी गावकऱ्यांनी सरकारकडे अनेकदा मागणी केली पण
सरकारने स्पष्ट असमर्थता दर्शवली होती. सुरुबातीला तर लोकांनी दशरथाला स्पष्ट
मुर्खात काढले. पागल म्हनुनही संबोधायचे पण दशरथचा ठाम निश्चय आणि त्याची
सातत्याची जिद्द पाहून पुढे त्याच लोकांनी त्याला काही प्रमाणात मदत करण्यास
सुरुवात केली. काही लोक त्याच्याकरिता जेवण आणून द्यायचे, तर तर काही साहित्याची
मदत पुरुवायचे मात्र त्याच्या कामाचे
तुलनेत ही मदत नगण्यच होती, तरीही १९८२ साली दशरथ मांझीने हा संपूर्ण पहाड खोदून
काढला. गहेलोर असे त्या पहाडवजा टेकडीचे नाव होते. आज या ठिकाणाला दशरथचे नाव
देण्यात आले आहे. या रस्त्यामुळे तब्बल पाच किमीचे अंतर कमी झाले आहे. या
रस्त्यामुळे पूर्वी ८ किमीचा पडणारा हा रस्ता आता तीन किमीचाच झालेला असून
परिसरातील तब्बल ६० गावांच्या लोकांना याचा उपयोग होतो आहे. २००७ मध्ये दशरथ मांझीचा
कर्करोगाने मृत्यू झाला पण तो अजरामर होऊन गेला. आज त्याला लोक ‘Mountain Man’ म्हणून
ओळखतात. पहाड खोदण्याच्या कामात सरकारकडून कोणतीच मदत झालेली नाही. एरवी विदेशातून
कोट्यावधी, अब्जावधी रुपये आणणाऱ्या कोणत्याच सेवाभावी संघटनांनीही या कामात
मदतीचा हात दिलेला नाही. कारण सर्वानाच प्रसिद्धी मिळेल तेथेच मदत करायची असते.
दशरथच्या मृत्यनंतर बिहार सरकारने त्याच्या अंत्यसंस्कार केला आणि त्याचे नाव
पद्मश्री पुरस्काराकरिता प्रस्तावित केल्याचे ऐकण्यात आले होते.
प्रेम आंधळं जरूर असते, त्यात लहान-मोठ्या उच्चनीचतेचा
भेदभाव अजिबात नसतो, पण ते हिंसक मात्र नसतं. हिंसा करायला लावणारा प्रेम म्हणजे
केवळ भ्रम. ती राक्षसी महत्वकांक्षाच असते.
ताजमहालला प्रेमाचे प्रतिक का मानल्या
जाते, याचेच आश्चर्य वाटते, ताजमहाल पाहायला जाणा-या कथित रसिकांना तेथे मुमताज आणि शहाजहानची प्रेमकथा आठवायला
लागते पण त्या कबरीमधून हात छाटल्या गेलेल्या निरपराध कारागिरांचा आक्रोश का
ऐकायला येत नाही? म्हणतात, ताजमहालाची अशी प्रतिकृती पुन्हा कुणी निर्माण करू नये
म्हणून त्या कुशल कारागिरांचे हातच शहाजहानने छाटले होते. याचाच अर्थ शहाजहानने ताजमहाल
मुमताजच्या प्रेमापायी उभारलाच नव्हता. इतिहासात अजरामर होण्याच्या वैयक्तिक
स्वर्थापोटीच त्याने इतका मोठा घात घातलेला होता. शहाजहान खरा प्रेमी असता, तर
कारागिरांचे हात छाटण्याचे क्रोर्य त्याच्या हातून घडलेच नसते कारण ज्याच्या
अंतरंगात प्रेम वास करते, त्याचे हृदय सर्वाप्रतीच करुणेने भरून जात असते. शहाजहान
जर खराच प्रेमी असता तर त्याने दुसऱ्याच्याही प्रेमाचा सन्मान केला असता. पण
त्याने आपल्याच पुढल्या पिढीच्या प्रेमाचा तिरस्कार केलेला दिसतो, काही साहित्यकारांनी
दिलेल्या दाखल्यानुसार, ताजमहाल बनविण्यासाठी इराणवरून उस्ताद ईसा या स्थापत्य
अभियंत्याला खास भारतात बोलावण्यात आले होते. ईसाने ताजमहालाचे डिझाईन बनविले आहे.
इथे शहाजहानच्या कोणत्या तरी एका राणीपासून झालेल्या चमेली नावाच्या मुलीचा ईसावर
जीव जडला. शहाजहानने या ईसाचेही हात छाटले होते. पण तरीही चमेलीचे व त्याचे प्रेम
प्रकरण सुरूच होते. शाहनजहानला आपल्या मुलीचे हे प्रेम सुद्धा सहन झाले नाही आणि
त्याने पुढे ईसाची विषप्रयोगाने हत्या केली असेही सांगण्यात येते. ताजमहाल पाहताना
इतका डोळस बनून पाहायला हवं कि, तेथे अपघाती मृत्यू झालेले मजूर, हात छाटलेले ते
दुदैवी कारागीर, वास्तुशास्त्री ईसा आणि आयुष्यभर आपल्या इच्छा मारून जगलेल्या चमेलीसारख्या
स्त्रिया, या सर्वाचाही आक्रोश कानी पडायला हवा. संमोहित होऊन दीपून जावे आणि आपले
स्वत्वच गमावून बसावे असे आपण आज ताजमहालाचे कौतुक करीत असतो. अर्थात,
ताजमहालाच्या सौदर्याविषयी कुणाचेच दुमत असू शकत नाही पण तो शहाजहान व मुमताजच्या प्रेमाचे
प्रतिक कसे म्हणता येईल? शेकडो कारागीरांच्या हत्येचे आणि हिंसेचेच तो प्रतिक आहे
असेच म्हणावे लागेल. ताजमहालाच्या निर्मितीमुळे सर्वसामान्याची कोणतीच सोय झालेली
दिसत नाही उलट त्यात सर्वसामाण्याच्या कष्टाचाच पैसा ओतला गेलेला आहे. धनाढ्याच्या
करमणुकीचे फक्त साधन झालेला आहे याउलट दशरथ
माझींच्या गहेलोर पहाडाचे आहे. दशरथच्या पत्नीचे तर निधन झालेले होते. त्यामुळे तयार होणाऱ्या रस्त्याच्या
तिला काहीही फायदा होणार नव्हता याही जाणीव असुनही दशरथने अशक्य कोटीतले हे काम
करून दाखविले, कारण पत्नीच्या प्रेमातून
त्याला दुस-याच्या दु:खाविषयीच्या संवेदना
जागृत झाल्या. आपण जे दु:ख भोगले, ते इतरांच्या वाट्याला येऊ नये, या जाणिवेतूनच
दशरथने हे महान कार्य केले आहे. त्याच्या कामात जनतेच्या कोणत्याच पैशाची उधळण
झालेली नाही. आपलेच नाव राहावे म्हणून दुस-या कुणाने असे काम करू नये, ही हिंसेची भावना त्याच्या मनालाही शिवली नसेल
म्हणून खरे पत्नीप्रेम दशरथचेच असून खरे प्रेमाचे प्रतिक केवळ त्यानेच जगाला दिले
आहे असे ठामपणे म्हणता येईल. दशरथच्या प्रेमाची गोड फळे गेल्या ३४ वर्षापासून त्या परिसरातील ६० गावाचे लोक चाखत आहेत.
मूळ बातमी: श्री बबन
मोहरील यांची असुन दै. तरुण भारत मधील रविवारीय “आसमंत” पुरवणी मधुन २३/८/१५ ला प्रकाशित !




No comments:
Post a Comment